नदीची स्वच्छता आणि स्वास्थ
नदीची स्वच्छता आणि स्वास्थ....
नदीची स्वच्छता आणि स्वास्थ हे परस्परांशी जोडलेले असून, नदीचे स्वास्थ्य चांगले असेल तरच ती जीवनदायिनी म्हणून आपले कार्य प्रभावीपणे करू शकते.
नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून, ती एक परिपूर्ण परिसंस्था आहे, ज्यात पाणी, गाळ, वाळू, जलचर, सूक्ष्मजीव आणि किनाऱ्यावरील वनसंपदा यांचा समावेश होतो.
नदीच्या स्वास्थ्याचे घटक
नदीचे स्वास्थ्य चांगले आहे, पाण्याची गुणवत्ता, नदीच्या पाण्याचे तापमान, त्यातील विरघळलेला प्राणवायू चे प्रमाण, पाण्याची आम्लता ,आणि रासायनिक प्रदूषकांची पातळी योग्य असणे महत्त्वाचे आहे. जलचरांसाठी पाण्यात मुबलक प्राणवायू असणे आवश्यक आहे.
जलचर आणि जैविक विविधता, मासे, आणि इतर जलचर तसेच सूक्ष्म जीवजंतू यांचे अस्तित्व नदी स्वच्छ व वाहती ठेवण्यास मदत करते. जलचर हे नदीच्या परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत.
पात्राची संरचना : नदीपात्रात मुबलक वाळू असणे जलचरांच्या प्रजननासाठी आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहासाठी आवश्यक आहे. वाळूचा बेसुमार उपसा नदीच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरतो.
प्रवाह आणि वहन क्षमता : नदीचा नैसर्गिक प्रवाह अखंडित असणे आवश्यक आहे. धरणे आणि बंधारे यामुळे पाण्याचे प्रवाह थांबतात, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता बिघडते आणि परिसंस्थेचे संतुलन बिघडते.
नदीच्या स्वच्छतेपुढील समस्या (प्रदूषण)
मानवी हस्तक्षेपामुळे नदीच्या स्वच्छतेवर आणि स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरी भागात सांडपाणी सोडले जाते आणि मलनिःसारण, वाढत्या शहरांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो आणि तितक्याच प्रमाणात सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट गोदावरी व उपनद्यामध्ये सोडले जाते. यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते.
सातपूर व अंबड या औद्योगिक वसाहतींमधून बाहेर पडणारे रासायनिक आणि विषारी सांडपाणी नदीत मिसळल्यास पाणी दूषित होते, ज्यामुळे जलचरांवर आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
स्थानिक नागरिकांकडून गोदावरी व उपनद्यामध्ये, नदीपात्रात आणि किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या , इलेक्ट्रॉनिक कचरा आणि इतर घनकचरा टाकल्याने नदीची वहन क्षमता कमी होते आणि ती प्रदूषित होते.
शेतीत वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके पावसाच्या पाण्यासोबत वाहून नदीत मिसळतात, ज्यामुळे नदीत रासायनिक प्रदूषण होते.
गोदावरी नदी किनारी सिमेंट काँक्रिटच्या घाटाच्या माध्यमातून गोदावरी नदीत केलेले अतिक्रमण,नदीपात्राचा संकोच, त्या परिसरातील अतिक्रमणे आणि बांधकामे यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप बदलते.
गरज असेल तर नदी किनारी तात्पुरत्या स्वरूपात घाट बांधले जाऊ शकतात, प्रयागराज येथे खडी व रेतीच्या गोण्या भरून तात्पुरते घाट बांधले होते..
तसेच नाशिकमध्ये कुंभमेळा काळात तात्पुरते घाट बांधणे शक्य आहे..
तसेच, नदीत गाळ साचल्यामुळे तिची वहन आणि साठवण क्षमता कमी होते, ज्यामुळे पूर आणि दुष्काळासारख्या समस्या वाढतात.
नदी स्वच्छतेसाठी उपाययोजना
नदीचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आणि तिला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अनेक स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नाशिक महानगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडणे बंधनकारक आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे आणि नदीला आपली माता मानून तिची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
धार्मिक विधी आणि दैनंदिन जीवनात नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केल्यास पाण्याचे रासायनिक प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
मा उच्च न्यायालयाने आदेशीत केल्याप्रमाणे प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करणे आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
नदीकाठी वृक्षारोपण करणे आणि जलचरांचे संरक्षण करणे यामुळे नदीची परिसंस्था नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि संतुलित राहते.
नदीचे स्वास्थ्य आणि स्वच्छता टिकवणे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, कारण नदी ही आपली जीवनदायिनी आहे.
निशिकांत पगारे
अध्यक्ष
गोदावरी नदी संवर्धन समिती नाशिक..